गणपतीपुळे आराखड्यातील चुकीचे बांधकाम करणार्या शाखा अभियंता व उपअभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करा
रत्नागिरी: गणपतीपुळे विकास आराखड्यामधून मंदिराकडे जाणार्या मार्गावर बांधण्यात येणार्या कमानीचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. आराखड्यामध्ये ७ मीटरच्या रस्त्यावर कमान बांधायची ठरलेली असताना प्रत्यक्षात ५ मीटरवर कमान बांधण्यात आली आहे. या कमानीचे कामही व्यवस्थित झाले नसून कमान तिरकी झाली आहे. या कमानीवर जवळजवळ ४० लाख रु. खर्च करण्यात येणार आहे. यामुळे हे चुकीचे काम करणार्या शाखा अभियंता व उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी केली. स्थानिक प्रतिनिधी व ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. हे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यावर पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे काम बंद पाडले. त्यानंतर आ. सामंत यांनी प्र्रत्यक्ष जावून त्या भागाची पाहणी केली.
गणपतीपुळे आराखड्यासाठी निधी मिळविण्यासाठी आ. सामंत यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा विचार होता. असे असताना या आराखड्याचे काम घाईघाईने सुरू करण्यात आले. सामंत यांनी या ठिकाणी भेट दिली असता कामात अनेक त्रुटी आढळल्या. पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या चौकीची उंची कमी असणे तसेच तेथे असलेल्या पारंपारिक सर्व दुकानदारांना दुकाने उपलब्ध करून दिली जात नव्हती. याबाबत सामंत यांनी अधिकार्यांची बैठक घेवून त्यांना सूचना करुन सर्वांना सामावून घेण्यास सांगितले आहे.
www.konkantoday.com