
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चिपळूण पूर परिस्थितीची पाहणी

चिपळूण : तालुक्यात पावसाचा कहर झाला असून, पूर परिस्थिती उद्भवली आहे. वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५.५६ मी. म्हणजेच इशारा पातळीवर आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला आहे. ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. चिपळूणात उद्भवलेल्या या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे चिपळूणकडे दाखल झाले आहेत.

दरम्यान, काल रात्रीपासून रत्नागिरी जिल्हा पोलीस दल पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यरत आहे.
चिपळूण बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका , वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आले आहे. सखल भागातील विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोळकेवाडी धरण्याच्या मशीन काल ५.३० वाजता बंद करण्यात आलेल्या होत्या; परंतु कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने आज दुपारी १ः१० वा एक मशीन सुरू करण्यात आलेली आहे.
खेर्डी ते हेळवाक वाहतूक सुरू झालेली आहे. हेळवाक येथे रस्त्यावर पाणी साचल्याने हेळवाक-कराड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मिरजोळीमध्ये गुहागर रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असून, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूकही सुरळीत सुरू आहे.




