
जि.प. शाळांतील मुख्याध्यापकांनी पहिलीपासून सक्तीच्या हिंदी विषयाला विरोध करावा. मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र.
आबलोली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा परिषद शाळांतील मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रांपैकी गुहागर तालुक्यातील चिखली, जानवळे, पालपेणे, वाकी, कोंड शृंगारी उर्दू, पाटपन्हाळे, वरवेली तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये ही पत्र देण्यात येत आहे. या पत्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील सर्व मुख्याध्यापकांना पहिलीपासून सक्तीच्या हिंदी विषयाला आपण विरोध करावा, अशी विनंती करण्यात आली.यावेळी बोलताना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, “जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी संख्या कमी होत आहे. दोन विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी असताना तिसरा विषय माथी मारला जात आहे.

मराठी व इंग्रजी या दोन भाषा अनिवार्य असून, आता इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचे केले जात आहे, हे योग्य नाही. आज दुर्गम भागांमध्ये शाळेच्या इमारतीची दुरवस्था होत आहे आणि इमारती मोडकळीस आल्या आहेत, याकडे शासनाने प्रथम लक्ष देणे गरजेचे असताना हिंदी भाषा सक्तीची करण्यामध्ये शासन लक्ष घालत आहे हे निषेधार्थ आहे.”


तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले की, “नवीन शैक्षणिक धोरणानुसार हिंदी सक्तीला राजसाहेब ठाकरे यांनी प्रखर विरोध दर्शवला असून शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच विरोध करेल. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक यांच्यासह अनेक राष्ट्रात हिंदीची सक्ती केली जात नाही, मग महाराष्ट्रातच ही सक्ती का केली जाते याचे उत्तरही राज्य शासनाने दिले पाहिजे.”यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, पालशेत येथील दिलीप नार्वेकर, सांस्कृतिक विभाग राहुल जाधव, पत्रकार गणेश किर्वे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.