अंत्योदय प्रतिष्ठान कोकणातील पुरग्रस्तांच्या पाठिशी
रत्नागिरी: मुंबई येथील अंत्योदय प्रतिष्ठानमार्फत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांबरोबर प. महाराष्ट्रातील पुरग्रस्त जिल्ह्यातील कुटुंबांना गरजेच्या वस्तूंचे कीट देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात चांदेराई, हरचिरी भागात याचे वाटप करण्यात आले. उर्वरित ठिकाणी देखील हे कीट देण्यात येणार असल्याचे आ. प्रसाद लाड यांनी सांगितले. अंत्योदय प्रतिष्ठान ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था असून त्याच्या अध्यक्षा सौ. निता लाड या आहेत. या प्रतिष्ठानमार्फत गरजू व्यक्ती, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचे कुटुंब आदींना नेहमी मदत केली जाते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्हयातील ४७३ कुटुंबांना याचा फटका बसला आहे. या कुटुंबासाठी एक मदतीचा हात म्हणून १८ प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू, त्यामध्ये धान्य तसेच चटई, चादर, कुटुंबातील स्त्रीयांना साड्या, पुरूषांना कपडे, शाळेतील मुलांसाठी वह्या, पुस्तके, दप्तरे आदींचे कीट बनविण्यात आले असून त्याचे वाटप या संस्थेतर्फे केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वाटप कार्यक्रमाचा नुकताच भाजप कार्यालयात पार पडला. यावेळी आ. प्रसाद लाड, सौ. निता लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दिपक पटवर्धन, खेडच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, निलमताई गोंधळी व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यातील ३ हजार पुरग्रस्तांना तर प. महाराष्ट्रातील ५५०० कुटुंबांना कीट देण्यात येणार आहे. अजूनही ज्या लोकांना मदतीची गरज असेल त्यांनी आपली नावे भाजप कार्यालयात दिल्यास त्यांना मदत करण्यात येईल.