जिल्हा रूग्णालयातील रूग्णांची संख्या वाढली केसपेपरसाठीची एक खिडकी बंद असल्याने गर्दी उसळली
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात सर्वसामान्य रूग्णांसाठी आधार असले तरी या रूग्णालयाबाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. रत्नागिरी तालुक्याचे आमदार उदयजी सामंत यांनी नुकतीच रूग्णालयाला भेट देवून कामकाजाबाबत माहिती घेवून सूचनाही केली होती. मात्र तरी देखील सामान्य रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रूग्णालयात दाखल होण्याआधी केसपेपर काढणे जरूरीचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत जास्त वेळ रहायला लागू नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी खिडकी ठेवण्यात आली आहे. परंतु ही खिडकी बंद असल्याने केसपेपर देण्याचे काम एकाच कर्मचार्यावर पडत असल्याने केसपेपर मिळविण्यासाठी भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. सध्या रूग्णालयात साथीचे रूग्ण वाढले असून त्यामुळे रूग्णालयातील कॉटदेखील कमी पडत आहेत. आता केसपेपर काढण्यासाठी गर्दी उसळल्याने ज्येष्ठ नागरिकांचे यामध्ये हाल होत आहेत. त्यांच्यासाठी ही वेगळी खिडकी बनविण्यात आली असली तरी रूग्णालयाकडे कर्मचारी नसल्याने ही खिडकी बंद ठेवण्यात येत आहे.
www.konkantoday.com