धावत्या बसमध्ये बॅटरीचा स्फोट ,सुदैवाने चालक बचावला
देवरुख आगारातून सकाळी ६:४० वाजता सुटणाऱ्या देवरुख बुरंबी मार्गे फणसवळे बसमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. चालकाने ओला कपडा बॅटरीवर धरल्याने सुदैवाने त्याला फार मोठी इजा झाली नाही. या घटनेमुळे कार्यशाळेत गाड्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर आणि काळजीपूर्वक होते की नाही ? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देवरुख आगारातून आज सकाळी ६ :४० वाजता सुटलेली देवरुख फणसवळे बस क्रमांक ८९८४ ही बस बुरंबीतून पुढे फणसवळे मार्गावर असतांना अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे थोड्या संख्येने असलेल्या प्रवाशांच्यात मोठी घबराट पसरली. आवाज चालक केबीन मधून आल्याने पुढे जावून पाहिले असता बॅटरीचा स्फोट होवून ॲसीडचे थोडे पाणी चालकाच्या चेहऱ्यावर उडाल्याचे प्रवाशांना दिसून आले. प्रसंगावधान राखत चालकाने ओला कपडा बॅटरीवर धरल्याने पुढील अनर्थ टळला. सदर बस रात्रभर देवरुख आगारात उभी होती. आगारातून सुटलेल्या पहिल्या फेरीच्या बसची जर अशी स्थिती असेल तर, कार्यशाळेत देखभाल दुरूस्ती केली जाते की नाही ? जर केली जात असेल तर , ती काळजीपूर्वक केली जाते का ? असे प्रश्न प्रवाशांनी यानिमित्ताने उपस्थित केले आहेत. याच बरोबर गळक्या बससह काही बसचे पत्रे बाहेर आले असून बसचा लटकणारे भाग रस्त्यात पडून गंभीर अपघात घडण्याची शक्यता असल्याने आगारप्रमुखांनी नादुरुस्त बसचा आढावा घ्यावा आणि कार्यशाळेतील काम तंत्रशुध्द पध्दतीने होतेय का ? याचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.