दोन विद्युत वाहिन्या असूनही संगमेश्वर तालुका तीस तास अंधारात
अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती नसताना देखील संगमेश्वर तालुक्यात 33 केव्हीच्या वीज वाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे तीस तास विद्युत पुरवठा बंद होता.विशेष म्हणजे पर्यायी विद्युत वाहिनीवरही बिघाड असल्याने संगमेश्वरवासियांना अंधारात राहावे लागले. संगमेश्वर तालुक्याला विज पुरवठा करणार्या 33 के व्ही च्या दोन लाईन आहेत.एक लाईन निवळी ते संगमेश्वर आणि दुसरी आरवली ते संगमेश्वर अशी ओढण्यात आली आहे. यातील एक लाईन नादुरुस्त झाली तर दुसरी वापरायची असते. यातील एक लाईन सकाळी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. यामुळे गेले 24 तास तालुक्यातील 70 पेक्षा अधिक गावे अंधारात हाेती. महावितरणने दुसरी नादुरुस्त लाईन दुरुस्त करुन ठेवली असती तर ही वेळ आली नसती असे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.संगमेश्वरला पत्रकार आणि ग्रामस्थांनी पाठपुरावा करुन उपअभियंता कार्यालय मंजुर करण्यात आले, मात्र गेले वर्षभर येथे उप अभियंता कार्यरत नाही.
पत्रकार ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने आरवली येथे 110 केव्हीचे केंद्र सुरू करण्यात आले तरी आरवली संगमेश्वर ही कमी अंतराची लाईन देखभाल दुरुस्ती करुन सुरळीत ठेवता येत नसल्याने ग्राहक नाराज आहेत.ग्राहकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात असून पूर्वी सारखी उग्र आंदोलने आता होत नसल्याने महावितरणचे फावले असल्याची टीका होत आहे. विज प्रवाह खंडित राहिल्याने नळ पाणी योजना बंद राहिल्या व पावसाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. संगमेश्वर महावितरण कार्यालयातील उप अभियंता हे गेले वर्ष भर रिक्त असणारे पद तातडीने भरावे तसेच लाईन स्टाफची देखील कमतरता गणेशोत्सवापूर्वी भरुन काढावी अन्यथा महावितरणच्या संगमेश्वर कार्यालयावर धडक द्यावी लागेल असा इशारा संगमेश्वरचे उपसरपंच संजय कदम यांनी दिला आहे.