तिवरे येथील दुर्घटनेत आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या रूद्र चव्हाण याला १२ लाखांची मदत
चिपळुण तिवरे येथील दुर्घटनेत आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या रूद्र रणजीत चव्हाण याला राज्य शासन तसेच पंतप्रधान कार्यालय सहाय्यता निधीतून मिळुन त्याच्या पुढिल आयुष्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते रूपये १२ लाखाचा चेक देण्यात आला.
तिवरे येथील दुर्घटनेत रूद्रचे वडील रणजीत चव्हाण, आई रूतूजा चव्हाण तसेच दीड वर्षांची बहिण दुर्वा हीचा मृत्यु झाला. बहिण दुर्वा हीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. तिवरे येथील घटनेच्या पाहणी तसेच दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देताना रूद्रची कहाणी पालकमंत्री यांना कळली. त्याचवेळी त्यांनी रूद्रच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलत असल्याचे घोषित केले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीतील पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी चिपळुण येथे आले असताना शासकीय विश्रामगृहावर रूद्रला राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून रूपये ४ लाख तसेच पंतप्रधान सहायता निधीतून प्रत्येकी रूपये २ लाखांचा असे एकुण रूपये १२ लाखांच्या निधीचा चेक पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते रूद्र चव्हाण याला देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रांत जगताप मॅडम, तहसिलदार देसाई मुख्याधिकारी विधाते उपस्थित होते.