केंद्राने राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी :खा. सुनिल तटकरे

रत्नागिरी : कोकणात व पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात भयावह परिस्थिती असताना देखील सरकारने सुरूवातीला या विषयाकडे ज्या गांभीर्याने पाहणे गरजेचे होते ते त्यांनी पाहिले नाही. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोकणात अतिवृष्टी झाल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रातही मोठी पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्याकडे सरकारने गांभीर्याने पाहणे गरजेचे होते परंतु सुरूवातीला काही दिवस ही परिस्थिती ओढावूनही मुख्यमंत्री आपल्या महा जनादेश यात्रेत गुंतले होते. त्यानंतर पुरग्रस्तांना मदत करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सरकारने जमावबंदीचा दिलेला आदेशही चुकीचा होता. संतप्त झालेल्या लोकांसमोर सरकारच्या प्रतिनिधींनी जावून बाजू ऐकून त्यांची समजूत घालणे गरजेचे होते. सरकारमधील प्रतिनिधींनी संवेदना जागृत ठेवून संयम दाखविणे गरजेचे होते. परंतु सेल्फीचा मोह, पत्रकारांवर राग या गोष्टी सत्ताधार्‍यानी टाळण्याचे गरजेचे होते परंतु ते घडले नाही. तरी देखील या महत्वाच्या विषयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकीय भांडवल करू इच्छित नाही. अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसलेल्या सर्वांना परत उभे करण्यासाठी आपण सामुहिकपणे सामोरे जाऊया असेही तटकरे यांनी सांगितले.
अशा परिस्थितीत सरकारने तज्ञ व अनुभवी लोकांची मदत घेणे गरजेचे होते. एवढी गंभीर परिस्थिती असताना केंद्राचे पथकही या ठिकाणी तातडीने येणे आवश्यक होते परंतु ते आले नाही. केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या पुरग्रस्त भागाची पाहणी केली तेही कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना घेवून. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातली काय माहिती असणार? वाजपेयी सरकारच्या काळात मा. शरद पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली होती. ही कमिटी देशात कुठेही असे पुर किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याबाबत तातडीने निर्णय घेत होती. परंतु येथे तसे झाले नाही.
मुख्यमंत्र्यानी आता केंद्राकडे निधी मागितला आहे. तो निधी केंद्राने तातडीने द्यावा तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांचे घराबरोबरच शेती, पशूधन यांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, दूध, मुंबई-कोकणात येतो त्यावरही परिणाम होणार आहे. यासाठी या सर्वांना पूर्णपणे उभे करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत करणे गरजेचे आहे. कोकणात अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठे नुकसान झाले असून कोकणातील आपद्ग्रस्तांना प्रत्येकी माणसी ५ हजार रुपयांची मदत तसेच हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शासनाने करावी अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी आहे. कोकणात एवढी परिस्थिती निर्माण होवूनही तसेच ८० तास वाहतूक खोळंबूनही रत्नागिरीचे पालकमंत्री या ठिकाणी आले नाहीत. आता ते १५ ऑगस्टच्या निमित्ताने जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. यामुळे या परिस्थितीकडे सरकारने गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावी अशीही मागणी त्यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button