प्रादेशिक मनोरूग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी पुरात अडकले त्यामुळे रूग्ण हैराण
रत्नागिरी : रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकारी कोल्हापुरात कामासाठी गेले होते. ते पुरात अडकले. तर दुसरे अधिकारी चिपळूण येथील पुरात अडकले. त्यामुळे तीन वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली असलेल्या या रूग्णालयात दोन वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे रूग्णांचे हाल होत असून यामुळे रूग्ण हैराण झाले आहेत. याचा परिणाम रूग्ण सेवेवर झाला आहे. याशिवाय या रूग्णालयात अनेक समस्या असून कोट्यावधी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या इमारतीचा रूग्णांना फायदा होत नसल्याचे दिसत आहे. या नव्या इमारतीत असलेले स्वच्छतागृह फक्त अधिकारी आणि कर्मचारी वापरत असून इतरवेळी त्याला कुलूप ठोकले जाते. यामुळे या रूग्णालयात येणार्या रूग्ण व त्यांचे नातेवाईकांना मोडका दरवाजा असलेल्या जुन्या स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत असल्याने महिलांची कुचंबणा होते. या रूग्णालयात महाराष्ट्रातून अनेक ठिकाणांहून रूग्ण आणले जातात. त्यामुळे अनेक तास प्रवास करून आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना साधे स्वच्छतागृह देखील उपलब्ध होत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.