
श्री संस्थान श्री गणपतीपुळे हे मदतीसाठी नेहमीच तत्पर प्रसिद्धी परान्मुख राहून संस्था काम करते :डॉ. विवेक भिडे
रत्नागिरी : श्री संस्थान श्री देव गणपतीपुळे या संस्थेला सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. या संस्थेने आतापर्यंत अनेक नैसर्गिक आपत्ती, परिसरातील गरीब रूग्णांना वैद्यकीय मदत केली आहे. याशिवाय शाळांना जीवनोपयोगी साधने पुरविणे, मनोरूग्णालयाला विविध उपकरणे पुरविणे व धार्मिक गरजू संस्थांनासुद्धा आतापर्यंत मदत केलेली आहे. मात्र संस्था जे काम करते ते पूर्णपणे प्रसिद्ध परान्मुख राहून काम करते. त्यामुळे दिलेल्या देणग्या किंवा अन्य प्रकारच्या मदतीची संस्था कधीही प्रसिद्धी करत नाही, असे संस्थान श्री देव गणपतीपुळेचे डॉ. विवेक भिडे यांनी स्पष्ट केले आहे. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे ही पुरग्रस्तांना मदत करण्यास मागे का? अशा पद्धतीचे काही संदेश सोशल मिडियावर येत होते. याबाबत भिडे यांनी स्पष्ट केले आहे की, संस्थेने मागील पाच वर्षात सुमारे ४२ लाख रुपयांची मदत निरनिराळ्या समाजोपयोगी उपक्रमांना केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पाणी संदर्भात काम करणार्या नाम फाऊंडेशन, केरळमधील महाप्रलयाच्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती, सामुदायिक विवाह सोहळा समिती रत्नागिरी तसेच परिसरातील गरीब रूग्ण, सामाजिक संस्था यांना संस्थेने नेहमी मदत केली आहे.
संस्थेची भूमिका नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहण्याची आहे. त्यामुळे वेळोवेळी केलेल्या मदतीची प्रसिद्धी केली जात नाही. श्रीचे पैसे गरजूंना मदतीसाठी जाणे हीच श्रींचीच आज्ञा असते. आपण निमित्त असतो. त्याचे श्रेय घेणारे आम्ही कोण? ही संस्थेची भूमिका आहे. कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांसाठी विविध संस्थांचे मदतीबाबत नियोजन झालेले आहे. यामुळे तेथील बँकेचे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर त्यांना योग्य त्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. श्री गणपतीपुळे देवस्थानवर विश्वास असणार्या भाविकांच्यात कोणत्याही प्रकारे अज्ञानातून गैरसमज होवू नये म्हणून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबत याविषयावर आणखी काही चर्चा न करता संस्था आपल्या नेहमीच्या कार्य पद्धतीने सामाजिक समाजोपयोगी उपक्रम चालूच ठेवणार आहे, असे डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com