विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात बहुजन वंचित आघाडीचे सर्व पक्षांना आव्हान, ३ उमेदवार जाहीर
रत्नागिरी ः वंचित आघाडीचे प्रमुख व भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार उभे करून सर्व पक्षांना आव्हान देण्याचे निश्चित केले आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येवून यामध्ये तीन मतदार संघातील उमेदवारही निश्चित करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रसिद्ध बिल्डर व मुस्लिम समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते नासीर खोत यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. खोत हे इतर पक्षाच्या उमेदवारांना मोठ्ये आव्हान निर्माण करू शकतात. दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदार संघातून जि.प. सदस्य संतोष खोपकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे तर गुहागर विधानसभा मतदारसंघातून विकास यशवंत उर्फ अण्णा जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे बहुजन वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठी मते मिळवली होती.