मोबाईल टॉवरमुळे रत्नागिरीकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात विविध इमारतींवर मोबाईल टॉवर उभारले आहेत. मोबाईल कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे अनेक ठिकाणी कमी अंतरावर टॉवर उभे केले जात आहेत. मात्र हे टॉवर उभे करताना जागेचा अभाव व हे टॉवर उभारणीचा होणारा मोठा खर्च हे टाळण्यासाठी टॉवर कंपन्यांकडून तयार इमारतीच्या गच्चीवर टॉवर उभे केले जात आहेत. हे करताना त्या इमारतीच्या मालकाला भाडे मिळत असल्यामुळे हे टॉवर करण्यास त्यांची संमत्ती असते. एकीकडे अशा टॉवर्सपासून रेडिएशन होते असाही आक्षेप असताना आता टॉवरला लागणार्या आगीमुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये खेर्डी भागात नुकतीच टॉवरच्या मध्यभागी आग लागली. तर रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील एका इमारतीवर असलेल्या टॉवरच्या जनरेटरला आग लागण्याचा प्रकार झाला. या इमारतीत हॉस्पिटल असल्यामुळे रूग्णांची धावपळ उडाली होती. ही आग विझविण्यात नगर परिषदेला यश मिळाले. तरी देखील या प्रकारामुळे नागरिक सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
काल लागलेल्या आगीत जनरेटर गच्चीत खालच्या भागातच असल्यामुळे आग लगेचच विझविता आली परंतु उद्या गच्चीत उभ्या केलेल्या मोठ्या टॉवरला आग लागली तर ती विझविण्याची कोणतीही यंत्रणा नगर परिषदेकडे नाही. असे असताना नगर परिषद हे टॉवर उभारण्यास परवानग्या देत आहे. मात्र उद्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नगरपरिषदेकडे सध्या तरी अस्तित्वात नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद प्रशासनाने आता निदान अशा प्रकारे आग लागल्यास विझविण्याची यंत्रणा उभी केल्याशिवाय या टॉवरना परवानगी देवू नये अशी नागरिकांची मागणी आहे.