
चिपळुणात ‘बांधण वाचवा, आदिवासी वाचवा’च्या घोषणा; वाशिष्ठी-सती संगमावर आदिवासींसाठी आंदोलन
चिपळूण : सोमवारी वाशिष्ठी-सती संगमावर एकदिवसीय ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आदिवासी आदिम कातकरी संघटना, श्रमिक सहयोग, राष्ट्रसेवा दल, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आदी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. ‘बांधण वाचवा, आदिवासी वाचवा’ आदी घोषणा दिल्या.
यावेळी आदिवासी आदिम कातकरी संघटना तालुका अध्यक्ष संजय जगताप, तालुका सचिव महेश जाधव, जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, सुरेश पवार, विजया निकम, केतन निकम, सँच्युरी एशियाचे प्रकल्प समन्वयक मल्हार इंदुलकर, श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर, डीबीजे महाविद्यालयाचे प्रा. राम साळवी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सचिव धीरज वाटेकर, महेंद्रगिरी निसर्ग मित्रचे अध्यक्ष अनिकेत चोपडे आदी उपस्थित होते.
21 नोव्हेंबर रोजी सती नदीमध्ये गाळ उपसा कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागाचे जे. सी. बी. उतरवण्यात आले. यामध्ये कातकरी समाजाचे चौदा बांधण उद्ध्वस्त केले गेले. हा एक बांधण तयार करायला 25 ते 27 हजार रुपये खर्च येतो. प्रत्यक्ष बांधण उद्ध्वस्त होत असताना उपस्थित कातकरी कुटुंबाने विनंती करूनही जे. सी. बी. चे काम थांबवण्यात आले नव्हते. स्थानिक मासेमार आणि आदिवासी समाजाचे मत प्राधान्याने लक्षात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.