शासकीय रूग्णालयाची नवी इमारत रूग्णांसाठी खुली करणार ः म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या साथींनी जोर केल्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात गोरगरीब जनतेला उपचारासाठी यावे लागत आहे. रूग्णालयात येणार्या या रूग्णांना उपचारासाठी जागा कमी पडत असून त्यांना जमिनीवर गाद्या घालून झोपावे लागत आहे. एकीकडे असे असताना दुसरीकडे रूग्णालयाची शंभर खाटांची सुविधा असलेली इमारत उद्घाटन न झाल्याने पडून राहिली आहे. याबाबत कोकण टुडेने नुकतेच वृत्तही प्रसिद्ध केले होते. या प्रश्नी रत्नागिरीचे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जातीने लक्ष घातले असून ही इमारत रूग्णांना तातडीने खुली करून देण्यात येईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचा ताबा घेण्याचे पत्र जिल्हा शासकीय रूग्णालयाला दिले आहे. मात्र रूग्णालयाने या इमारतीचा ताबा घेतलेला नाही. या इमारतीचे उद्घाटनही अद्याप झालेले नाही. परंतु जनतेच्या सुविधेसाठी ही इमारत आता खुली करून देण्यासाठी आ. सामंत यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी उद्या जिल्हा शल्य चिकित्सक व बांधकाम विभागाचे अधिकारी यांची शासकीय रूग्णालयात बैठक लावली असून त्यानंतर उद्घाटनाची वाट न पाहता ही इमारत जनतेसाठी खुली करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले आहे. त्यामुळे जर ही इमारत उपलब्ध झाल्यास रूग्णांची मोठी सोय होणार आहे.
www.konkantoday.com