
रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर करावी -माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी आपण आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी तालुक्यामध्ये सन २००४-२००५ मध्ये पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर झाली होती. परंतु येथील काही लोकांच्या विरोधामुळे तसेच त्यांना लोकप्रतिनिधींनी त्यांना पाठबळ दिल्यामुळे ही एमआयडीसी त्यावेळचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल-कोल्हापूर येथे नेली. त्यामुळे तेथील ८० ते ९० हजार लोकांना रोजगार, व्यवसाय मिळाला.
महाराष्ट्रात त्यावेळी एकूण पाच पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी निवळी पंचतारांकीत एमआयडीसी होती. रत्नागिरीसह कोकणामध्ये नेहमीच प्रदूषण विरहित प्रकल्प यावेत अशी जनतेची मागणी होती. त्यामुळे या एमआयडीसीत प्रदूषणविरहित प्रकल्प येणार होते. परंतु त्याला काही ठराविक लोकांनी विरोध केल्याने व त्याला लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिल्याने त्यावेळच्या सर्व तरूण मुलांना मोठ्या प्रमाणावर बेरोजगाराला तोंड द्यावे लागले होते. अनेकजण व्यसनाच्या आहारी जावून उध्वस्त झाले होते.
आज रत्नागिरीच्या व्यापार्यांमध्ये मंदी आहे. बाजारपेठ ओस पडण्याच्या मार्गावर आहे. बर्याच व्यापार्यांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. बांधकाम व्यवसायात देखील तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आजही अनेक तरूण बेरोजगार आहेत. आपण गेली १८ वर्षे या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत आहात. तालुक्यातील लोकांना नोकरी व व्यवसायासाठी कोणतीही संधी उपलब्ध झालेली नाही. आज आपल्याकडे उद्योगमंत्री पद आहे. आपण आपल्या माध्यमातून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पंचतारांकीत एमआयडीसी मंजुर करावी. जेणेकरून रत्नागिरी विधानसभा मतदार संघ आणि परिसरातील लोकांच्या नोकरी व व्यवसायाचे प्रश्न सुटतील व ते विस्थापित होणार नाहीत. व लोकांना स्वतःचा शहरामध्ये राहून नोकरी व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल. त्यामुळे या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर करून द्यावी अशी मागणी कीर यांनी केली आहे.
www.konkantoday.com