
जनतेच्या हिताची कामे होतच रहाणार, त्याचे राजकीय श्रेय कुणी लाटू नये : प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे.
आबलोली : “गुहागर आगाराचे आगार प्रमुख इतर अधिकारी सक्षम आहेत. जनतेच्या हितासाठी चांगली कामं करत आहेत प्रवाशी संघटनेचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी संपर्क साधून आहेत. आवश्यक गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी सर्वचजण मागणी करतात पत्रव्यवहार करतात. प्रवाशी संघटनेच्या वतीने नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी राज्य सरकारकडे आम्ही स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत आग्रह धरला होता, त्या प्रमाणे नवीन गाड्या आल्या. त्याचे लोकार्पणसुद्धा झाले. त्या बाबत आमदार भास्कर जाधव यांचे तमाम प्रवाशी जनतेच्या वतीने जाहीर आभार, असे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
श्री. कांबळे म्हणाले, ” जनतेच्या खासगी कामानिमित्त मी बाहेर गावी होतो; मात्र नवीन गाड्यांचे स्वप्न ७० वर्षांनंतर गुहागर जनतेला पहाव्यास मिळाले. यामध्ये आमदार जाधव यांचे मोठे योगदान आहे, पण त्यांनी या कामाचे राजकीय भांडवल केले नाही; मात्र विरारला गाडी सोडण्यात आली हे काम आम्ही केले असे काही बोलत आहेत. सामाजिक कामाचे कुणीही राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. गुहागरच्या सर्वसामान्य विकासासाठी आपण बिगर राजकीय फोरमची संकल्पना मांडली आहे. कारण राजकारण विरहित आणि लॉबिंग पॉलिटिक्स याला भविष्यात छेद दिला, तरच गुहागर तालुक्यातील विकासासाठी प्रगतीचे पाऊल ठरेल. गुहागरच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर काम करणार आहोत.”निवडणूक काळात राजकारण ठीक आहे, पण काही लोकांच्या अंगात बारा महिने कावीळ झालेले राजकारण सातत्याने पिवळे होते याची खंत वाटत असल्याचे पराग कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.