खाजगी पुरवठादारांनी पाठ फिरवल्याने एस.टी. महामंडळाच्या अनेक शिवशाही बसेस बंद, गणपती उत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांना बसणार फटका
रत्नागिरी ः राज्याचे परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जनतेला महामंडळाकडून अत्याधुनिय सोयीनीयुक्त बसेसने प्रवास करता यावा यासाठी शिवशाही बसेसची योजना २०१७ मध्ये सुरू केली. यामध्ये त्यावेळी एकूण ९५० बसेस खरेदी करण्यात आल्या. यापैकी ५०० बसेस एस.टी. महामंडळाने स्वतःच्या मालकी तत्वावर घेतल्या तर उर्वरित ४५० बसेस खाजगी कंपनीकडून भाड्याने घेतल्या.
वेगळ्या आकर्षक रंगाच्या या शिवशाही बसेसने सुरूवातीला सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्यानंतर खाजगी कंपन्यांच्या शिवशाही बसेसला मोठ्या प्रमाणावर अपघात झाले. यामध्ये अनेक प्रवाशांचा बळीही गेला. बेदरकारपणे बसेस चालवणे, एसी बंद होणे, चाक निखळणे आदी अनेक तक्रारी येवू लागल्याने एस.टी. महामंडळाने या खाजगी कंपन्यांच्या धोरणामध्ये बदल केला. यामध्ये खाजगी पुरवठादारांचा मोबदला कमी करण्यात आला. याशिवाय तक्रारी आल्यास दंडाची तरतूद केली. याचा फटका खाजगी कंपन्यांना बसला. यामुळे एस.टी. महामंडळाला शिवशाही भाडे तत्वावर देणार्या एरॉन व रेनबो या कंपन्यांनी एस.टी. महामंडळाला पुरविलेल्या ६३ शिवशाही काढून घेतल्या. यामुळे आणखीही काही कंपन्या बसेस काढून घेण्याच्या तयारीत आहेत. एस.टी. महामंडळ चुकीचे धोरण राबवित असल्याचे खाजगी कंपन्यांचे म्हणणे असून यामुळे एकूणच गणपती उत्सवासाठी कोकणासह अनेक भागात जाणार्या गणेशभक्तांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com