
गणपतीपूर्वी शहरातील रस्त्याचे खड्डे डांबराने बुजवणार ः नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांची ग्वाही
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्य रस्ते ८५ टक्के खराब झाले आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ही वस्तुस्थिती मान्य असली तरी रत्नागिरी नगर परिषदेकडून गेले काही दिवस हे खड्डे सातत्याने चिर्याचा बुरुंब घालून बुजविण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु सकाळी भरलेले खड्डे होणार्या अतिवृष्टीमुळे बुरूंब वाहून जावून परत खड्डे आहेत त्या स्थितीत येत आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांना या खड्ड्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे याची आपणाला कल्पना आहे. गणपतीपूर्वी हे खड्डे पूर्णपणे डांबराने भरले जातील, अशी ग्वाही रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पाणी सभापती सुहेल मुकादम, बिपीन बंदरकर, बाळु साळवी आदीजण उपस्थित होते.
हे खड्डे डांबराने बुजविण्यासाठी ५० लाखांचे इस्टीमेट करण्यात आले आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर करण्यात येणार असल्याने त्यावेळी दोन तीन दिवस आधी पावसाने उसंत घेणे जरूरीचे आहे. गणपतीपूर्वी रत्नागिरीकरांची खड्ड्यांची समस्या १०० टक्के सोडवली जाईल असे सांगून साळवी यांनी सांगितले की हायवेसाठी वापरले जाणारे जे मटेरियल वापरायचे झाल्यास त्याचे इस्टीमेट तिप्पटीने जाणार आहे. तरी देखील त्याची माहिती घेण्यात येणार आहे. या मुख्य रस्त्याच्या खालून अनेक ठिकाणी नळाच्या पाईपलाईन गेल्याने हे खड्डे पडत आहेत. मात्र आता नव्याने मंजूर झालेल्या पाईपलाईनच्या योजनेखाली दोन्ही बाजूने पाईप जाणार असल्याने ही योजना पूर्ण झाल्यानंतर नळाच्या कनेक्शनसाठी रस्ते खोदावे लागणार नाहीत. शहरात गॅस पाईपलाईन, रिलायन्स केबल आदींचे काम चालू आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे लागणार आहे असेही साळवी यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
www.konkantoday.com




