कुडाळ मध्ये दशावतार कला म्युझियम होण्यासाठी प्रयत्न करणार-प्रमोद जठार
दशावतार कला ही कोकणची सांस्कृतिक परंपरा म्हणून पाहिले जाते. या कलेला मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाच्या संवर्धनाचे काम येथील दशावतारी कलाकार करीत आहेत. या संवर्धनासाठी कुडाळला या कलेचे म्युझियम होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी जागा उपलब्ध करा. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण पहिला निधी या म्युझियमसाठी देणार, अशी ग्वाही कोकण पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शिवसेनेतर्फे व जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या सौजन्याने आयोजित महोत्सवाच्या दुसऱया दिवशी येथील सिद्धिविनायक सभागृहात ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा जठार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व मानधन देऊन सत्कार करण्यात आला. महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
www.konkantoday.com