
राजापुरातील अतिक्रमणे हटवली; मुख्याधिकार्यांच्या निर्णयाचे कौतुक
राजापूर : राजापूर बाजारपेठेतील अतिक्रमणे शुक्रवारी हटवल्याने या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी हा निर्णय घेतला. आता बाजारपेठेत दिवसभर पार्किंग करून ठेवण्यात येणार्या दुचाकींवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाजारपेठेतून जाणार्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्याने बाजारपेठेने आता मोकळा श्वास घेतला आहे. नूतन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केलेल्या या कारवाईचे राजापुरातील नागरिकांसह स्थानिक व्यापार्यांनी स्वागत केले. आधीच अरुंद असलेल्या राजापूरच्या बाजारपेठेतील अतिक्रमणे शुक्रवारी हटवल्याने बाजारपेठेने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व अन्य वाहने मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेली दिसून येत आहे. या बेशिस्तपणे लावण्यात येणार्या दुचाकी व अन्य वाहनांमुळे राजापूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. अतिक्रमणे हटवली गेल्याने आता बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र वाहतूक कोंडीपासून कधी सुटका मिळणार? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.