सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत सुदैवी ठसाळे ठरल्या प्लास्टिक मुक्त चिपळूण ’होम मिनिस्टर’


१५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत चिपळूण नगर पालिकेच्यावतीने सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने आयोजित प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धा २०२५ या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहोळा व होम मिनिस्टरचा खेळ सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे मोठ्या उत्साहात रंगला. अभिनेते ओंकार भोजने व आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या खेळात लकी ड्रॉमधून वसुंधरा पाटील यांना मानाची पैठणी मिळाली, तर सर्वाधिक ३८.५ किलो प्लास्टिक जमा करून १५४ कूपन मिळवणार्‍या स्वप्नाली सुनील निवाते या दुसर्‍या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. अटीतटीच्या होम मिनिस्टर खेळातून सुदैवी ठसाळे या सोन्याच्या नथच्या मानकरी ठरल्या.
प्लास्टिक मुक्तीसाठी महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. प्रत्येक १ किलो प्लास्टिकमागे महिलांना ४ कूपन्स देण्यात आले. शहरातील तब्बल ३०० हून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व एकूण १७४१ किलो प्लास्टिक जमा झाले. यामध्ये १५ पेक्षा जास्त कूपन्स मिळवणार्‍या १९२ महिलांमध्ये प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर हा खेळ घेण्यात आला. रत्नागिरी येथील लोककलावंत सुनिल बेंडखळे यांनी या खेळात रंगत आणली. लकी ड्रॉमधून जयंत साडी सेंटरने प्रायोजित केलेली मानाची पैठणी वसुंधरा पाटील यांना मिळाली. १०० पेक्षा जास्त कूपन्स मिळवणार्‍या महिलांना जिव्हाळा मार्ट, काविळतळी यांच्याकडून प्लास्टिकपासून अप सायक्ल बनवलेल्या आकर्षक शॉपिंग बॅग देण्यात आल्या. आसिफ तुरुक, जयश्री आंबेकर, कविता मिर्लेकर, तेजस्विनी किंजळकर, रूपाली आवले व साक्षी लोटेकर या महिलांनी १०० पेक्षा जास्त कूपन्स मिळवले. एकूण १०९ महिलांना १५ कूपन्स मिळवता आले नाहीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र लकी ड्रॉ काढण्यात आला. यातून सानिका पडवेकर, अश्विनी भुस्कुटे व फैमीदा शेख या भाग्यवान महिला ठरल्या. त्यांना नगर पालिकेच्या वतीने अपसायकल पद्धतीने बनवलेल्या शॉपिंग बगे भेट देण्यात आल्या.
स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना जिव्हाळा मार्ट काविळतळी यांच्याकडून खरेदीवर ५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. या सोहोळ्याला आमदार शेखर निकम, अभिनेते ओंकार भोजने, नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम, मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी सभापती पूजा निकम, सुमित लोंढे, आदिती देशपांडे, प्राजक्ता टकले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button