
रत्नागिरीत भीमा कोरेगाव शौर्यदिनाचा ऐतिहासिक अभिवादन सोहळा
१८ फूट उंच विजयस्तंभ प्रतिकृतीतून क्रांतिकारी संदेश
रत्नागिरी/ प्रतिनिधी
कोकणातील सामाजिक चळवळीला नवी दिशा देणारे क्रांतिकारक पाऊल म्हणून रत्नागिरी शहरात प्रथमच भीमा कोरेगाव शौर्यदिन (विजयदिन) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती, ता. जि. रत्नागिरी यांच्या वतीने दि. १ जानेवारी २०२६ रोजी हा ऐतिहासिक अभिवादन सोहळा पार पडला.
या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी १८ फूट उंच भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित बंधुभगिनींनी विजयस्तंभास मानवंदना अर्पण केली. १८१८ सालच्या भीमा कोरेगाव युद्धातील ५०० शूरवीर सैनिकांना अभिवादन करताना घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. विजयस्तंभाला सलामी देताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात शौर्य, आत्मसन्मान आणि सामाजिक चेतना जागृत झाल्याचे चित्र दिसून आले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असा अभिवादन सोहळा सुरू करून थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीने सामाजिक प्रेरणेचे एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक पाऊल उचलले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्येष्ठ प्रबोधनकार व इतिहास संशोधक प्रा. सुहास नाईक (पुणे) यांनी भीमा कोरेगाव युद्धाचा जाज्वल्य इतिहास उलगडून दाखवला. इतिहासातील विविध दाखले देत त्यांनी ५०० शूरवीरांच्या शौर्यगाथा प्रभावीपणे मांडल्या. तसेच १८८५ साली म्यानमारहून भारतात बंदिवान करून आणण्यात आलेल्या थिबा राजा यांच्या बौद्ध धम्म पुनरुज्जीवनातील जागतिक योगदानाचा सखोल आढावा घेतला. थिबा राजा कालीन बुद्ध विहाराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रा. सुहास नाईक यांचा एल. व्ही. पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभाची भव्य प्रतिकृती विनामूल्य साकार करणारे शिल्पकार मिलिंद कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, तुषार जाधव, दीपक जाधव, शिवराम कदम, सुनिल आंबूलकर, दिवेन कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रदिपदादा पवार, अजित जाधव, रत्नदीप कांबळे, सागर जाधव, जितेंद्र कांबळे, मिलिंद सावंत, विरश्री बेटकर, स्मिताताई कांबळे, अस्मिता कांबळे, राजन जाधव, बबन कांबळे, मनोहर पवार, राजू जाधव, बी. के. कांबळे, ॲड. प्रवीण कांबळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी सुनिल आंबूलकर यांनी आभार प्रदर्शन केले.




