पानवल धबधब्यावर मद्य पिण्यास ग्रामपंचायत व पोलिसांची बंदी
रत्नागिरी ः गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करून वर्षा सहलीचा आनंद लुटत आहेत. निसर्गप्रेमी अशा ठिकाणावर कौटुंबिक सदस्यांसह वर्षा सहलीचा आनंद लुटत असत. परंतु आता याचे स्वरूप बदलत जात असून अशा धबधब्याच्या ठिकाणी आता दारू पिण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे दारू पिल्यानंतर बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या डिशेस त्याच ठिकाणी टाकल्या जात असल्याने पर्यावरणाचा समतोल बदलत असून ही ठिकाणे दिवसेंदिवस अस्वच्छ होत आहेत. आता याबाबत स्थानिक ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. निवळी, पानवल, उक्शी या ठिकाणच्या धबधब्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. आता प्रशासनाने देखील याबाबत कडक धोरण स्विकारले असून धोकादायक धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे. याशिवाय पोलीस व ग्रामस्थ देखील या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागरूक झाले आहेत. पानवल येथील धरणावर व धबधब्याच्या ठिकाणी आता दारू पिण्यास बंदी घातली असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसू शकणार आहे.
www.konkantoday.com