५ दिवसानंतर मृतदेह सापडला

कुडाळ :- भडगाव येथील पुलावरून नदी पात्रात पडलेल्या अणाव दाभाचीवाडी येथील नवविवाहिता सौ. दिप्ती जिकमडे हिचा मृतदेह अखेर पाच दिवसानंतर कडावल येथील नदीपात्रात सापडून आला. दरम्यान याप्रकरणी तिचा पती हरी जिकमडे याच्या विरोधात मोटरसायकल हयगईने व अविचाराने चालविल्याबद्दल आणि पत्नीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अणाव दाभाचीवाडी येथील हरी जिकमडे व त्यांची पत्नी सौ. दिप्ती जिकमडे हे पती-पत्नी जांभवडे येथील आपल्या नातेवाईकांकडून घरी परताना भडगाव पुलावर मोटरसायकलसमोर आलेल्या सापाला वाचविताना हरी जिकमडे याचा मोटरसायकलवरील तोल गेला आणि यामध्ये मोटरसायकलसह हरी जिकमडे व त्याची पत्नी सौ. दिप्ती जिकमडे दोघेही नदीपात्रात पडले. यात हरी जिकमडे हा पोहत किना-यावर आला. मात्र त्याची पत्नी या पाण्यामध्ये वाहून गेली. पाण्यात वाहून गेलेल्या सौ. दिप्ती जिकमडे हिचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून पथके बोलविण्यात आली होती तसेच पोलिस यंत्रणा सुद्धा कार्यरत करण्यात आली होती. गेले चार दिवस नदीपात्रात दिप्ती जिकमडे हिला शोधण्यासाठी पथके कार्यरत होती. यामध्ये बाबल आल्मेडा व पुणे येथील एन. डी. आर. एफ. चे पथक सुद्धा कार्यरत करण्यात आले होते. मात्र तिचा शोध कुठे लागत नव्हता. दरम्यान या पथकाला मृत दिप्ती जिकमडे हिची साडी, पर्स भडगाव नदीत सापडून आली होती.
आज शनिवार सकाळी ११ वाजल्यापासून पुन्हा एकदा दिप्ती जिकमडे हिच्या शोधार्थ पथके निघाली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कडावल चर्च जवळील नदीपात्रात दिप्ती जिकमडे हिचा मृतदेह बाबल आल्मेडा यांच्या पथकाला सापडून आला. हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दिप्ती जिकमडे ही पूर्वाश्रमीची कुडाळ वरची कुंभारवाडी येथील दिप्ती कुंभार असून मे महिन्यात तिचा विवाह हरी जिकमडे यांच्यासोबत झाला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button