नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही ,गृहराज्यमंत्री योगेश कदम


कोकणातील दोन मंत्र्यांमध्ये आता जुंपली आहे
नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं.मतदारसंघात शांतत कशी राखावी हे मला चांगलं समजतं असे चोख प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांना दिले. दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज मंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचं बाळकडू पाजलंय. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावं, असा टोला देखील योगेश कदम यांनी राणेंना लगावला. आमच्या हाहात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहिल असे योगेश कदम म्हणाले. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये असेही योगेश कदम म्हणाले. माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही असा टोला योगेश कदम यांनी लगावला.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?

इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो असे नितेश राणे दापोलीमध्ये म्हणाले होते. काही चिंता करु नका, आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये जर नाव आले नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधीत खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावं, अशी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.

ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावे

माझ्या मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला बाहेरून आलेल्यांनी शिकवण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मी गृहविभागाच्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करतो असे योगेश कदम म्हणाले. शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाही. तो भविष्यातही अभिमानाने फडकवत राहणार आहोत. ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावे. आम्ही गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी काम करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button