
संसदेत तिहेरी तलाक बंद विधेयक मंजूर
नवी दिल्ली :- मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रथेवर बंदी घालण्याबाबतचे विधेयक गुरुवारी लोकसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. संसदेत याआधीही महिला कल्याणाचे असंख्य कायदे बनले आहेत. अशा स्थितीत मुस्लिम महिलांना न्याय देणारे तिहेरी तलाकबंदीबाबतचे विधेयक संसदेत आणणे योग्यच असून, तिहेरी तलाक देणार्या इसमास तीन वर्षांच्या तुरुंगवासाची करण्यात आलेली तरतूददेखील आवश्यक असल्याची ठोस भूमिका केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुमारे सहा तास चाललेल्या चर्चेला उत्तर देताना मांडली. कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली, तरच त्याचा धाक निर्माण होईल, असे सांगितले.
मुस्लिम महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठीच सरकारने हे विधेयक आणले असल्याचे सांगून प्रसाद म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा निकाल दिल्यानंतरही तलाक दिल्याचे ३४५ प्रकार घडले आहेत. पत्नी तंबाखूच्या मिश्रीपासून दात घासते म्हणून तलाक दिल्याचे प्रकरण नुकतेच उत्तर प्रदेशात घडले आहे. अशी किती तरी उदाहरणे आहेत. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन लैंगिक समानता कशी येईल, हे पाहिले पाहिजे. याच उद्देशाने मोदी सरकारने हे विधेयक आणले आहे.