
आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे चिपळूण-संगमेश्वरमधील अंगणवाड्या होणार स्मार्ट
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील ३० अंगणवाड्यांना स्मार्ट बनवण्यासाठी तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लहान मुलांना सुरक्षित, आकर्षक आणि शिक्षणास पोषक वातावरण मिळणार आहे. या स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये डिजिटल शिक्षण साधने, आकर्षक शिक्षण सामुग्री, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधा अशा अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांचा उद्देश ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि बालकांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार शेखर निकम म्हणाले, स्मार्ट अंगणवाडी म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर बालकांच्या ×उज्ज्वल भविष्यासाठी एक गुंतवणूक आहे. प्रत्येक गावातील मुलांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. या उपक्रमामुळे चिपळूण-संगमेश्वर परिसरातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट होवून बालशिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण होणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com




