
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या सामाजिक उपक्रमाच्या मदतीसाठी “लायन्स बझ” शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचे आयोजन,चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये मोठ्या संख्येने महिला उद्योजक सहभागी होणार
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने २ एप्रिल ते ६ एप्रिल या दरम्यान “लायन्स बझ” हा भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवल जयेश मंगल कार्यालय, माळनाका येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनातून मिळणारा सर्व निधी हा लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्प तसेच क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार असल्याची माहिती लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष लायन गणेश धुरी यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात २६ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सचिव लायन विशाल ढोकळे, खनिजदार लायन अमेय वीरकर, लायन प्राची शिंदे, लायन श्रिया केळकर, लायन संजय पटवर्धन, लायन ओंकार फडके, लायन सुप्रिया बेडेकर उपस्थित होत्या.
गेली वीस वर्षांहून अधिक काळ लायन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात मोतीबिंदू निवारण साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात शिबिरे घेऊन तेथे सापडलेल्या मोतीबिंदू रुग्णावर रत्नागिरीतील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात; मात्र सध्याच्या रुग्णालयाची जागा अपुरी पडू लागल्यामुळे एमआयडीसीतील बाजुच्याच प्लॉटमध्ये विस्तारित प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आय हॉस्पिटलच्या विस्तारित प्रकल्पाबरोबरच समाजातील गरजा लक्षात घेत लायन्स ब्लड बँक प्रकल्पही या इमारतीत सुरू करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध निधीसंकलन कार्यक्रमांपैकीच हा एक उपक्रम असल्याचे लायन धुरी म्हणाले.
किडनी फेल्युअरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत्तच आहेत. अशा रुग्णांमध्ये डायलिसिस करणे किंवा किडनी प्रत्यारोपण करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. बहुतांश रुग्णांना किडनी प्रत्यारोपण करणे शक्य होत नाही व परवडणारे नसते. त्यामुळे हिमोडायलिसिस करणे हाच पर्याय राहतो. ज्या गरीब रुग्णांना आठवड्यातून दोन तीन वेळा डायलिसिस करणे आवश्यक असते ते अर्थिक अडचणीमुळे कसेबसे आठवड्यातून एकदाच डायलिसिस उपचार करतात. ह्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरीतील सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरीटेबल ट्रस्ट ने ही सुविधा “लायन्स”च्या माध्यमातून देण्याचे नक्की केले. अत्यंत किफायशीर दरात ही सुविधा देण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२४ मधे डायलेसिस सेंटर ची सुरुवात झाली असून आतापर्यंत अत्यल्प दरात डायलेसिस सुविधा देण्यात येत होती. थोड्याच कालावधीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मान्यता मिळाल्यावर ही सुविधा पूर्ण पणे मोफत दिली जाणार आहे; परंतु वाढीव रुग्ण संख्या आणि डायलेसिसची गरज पहाता लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने डायलेसिसची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला असून येत्या डिसेंबर २०२४ पासून याचा लाभ रत्नागिरीतील रुग्ण घेऊ लागले आहेत. एका रुग्णाची आठवड्याला दोन डायलिसीस ही मोफत करण्यात येत असून पुढील डायलेसिससाठी अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती श्री. धुरी यावेळी दिली.
प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, “या प्रदर्शनाचे उद्दिष्ट केवळ निधी उभारणी पुरते मर्यादित बसून स्थानिक व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे हाही आहे. विशेषतः महिला बचत गटातील महिला आणि उद्यनमुख उद्योजकांना यातून व्यवसायाची सुवर्णसंधी मिळणार असून ग्राहकांना देखील विविध आकर्षक वस्तू तसेच खाद्यपदार्थ आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनात खरेदी प्रेमींसाठी विविध कपडे, आकर्षक दागिने, सुंदर हस्तकला वस्तूंसह अनेक स्टॉल असणार आहेत. तर खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रदर्शनाची वेळ ही सकाळी १० ते रात्री १० अशी असून चारही दिवस रत्नागिरीकरांना खरेदी आणि आनंदाचा अनुभव घेता येणार आहे. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष लायन एमजेएफ गणेश धुरी यांनी सर्व व्यावसायिक आणि नागरिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याचे तसेच स्टॉल बुकिंगसाठी लायन प्राची शिंदे (९४२२३७६२२४, ९७६४४१७०७९) किंवा लायन MJF लायन ओंकार फडके (९४२२०५०७६२) यांच्याशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
हा उपक्रम रत्नागिरीच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा असून, या प्रदर्शनातून मिळणारा निधी नेत्र रुग्णालयाच्या विस्तारासह नवीन सामाजिक कार्यांना बळ देईल, असे अध्यक्ष लायन गणेश धुरी यांनी नमूद केले. लायन्स क्लबच्या या उपक्रमाला रत्नागिरीकरांकडून तसेच रत्नागिरीच्या बाहेरील देखील व्यवसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये मोठ्या संख्येने महिला उद्योजक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. स्थानिक व्यावसायिक आणि महिला बचत गटांना यातून प्रोत्साहन मिळेल, तसेच हॉस्पिटलच्या विस्तारामुळे गरजू रुग्णांना देखील अधिक चांगल्या सुविधा मिळतील याबद्दल नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहेत या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे सर्व सदस्य आणि स्वयंसेवक तयारी लागले असून रत्नागिरीकरांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.