काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. आज १२ डिसेंबर सकाळी साडे सहाच्या सुमारास लातूर येथील त्यांच्या देवघर या निवासस्थानी वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत होते.

शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्याशिवाय यांनी देशातील अनेक उच्चपदावर काम केले आहे. केंद्रीय राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. २००४ ते २००८ या काळात शिवराज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय लोकसभेचे ते अध्यक्षही राहिले आहेत. केंद्रात संरक्षण, वाणिज्य, विज्ञान तंत्रज्ञान, नागरी उड्डाण, पर्यटन यासारखी इतर मंत्रि‍पदे त्यांनी भूषवली आहेत. २०१० ते २०१५ या काळात पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून त्यांनी कार्य केले.

मूळचे लातूरच्या चाकूरमधील रहिवासी असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील एक प्रभावी काँग्रेस नेते होते. लातूर मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत होती. त्यामुळेच एक दोनदा नव्हे तर तब्बल ७ वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांचा पराभव झाला परंतु काँग्रेसने त्यांचा अनुभव पाहता राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. महाराष्ट्रासह देशातील दिग्गज नेते असणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं राज्यासह देशातील राजकारणात मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत काँग्रेससोबत सर्वच राजकीय पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामुळे राजीनामा

शिवराज पाटील चाकूरकर हे देशाचे गृहमंत्री असताना २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी प्राण गमावले. वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. या हल्ल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यावेळी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत ३० नोव्हेंबर २००८ रोजी त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय स्तरावर अनेक मंत्रि‍पदे, राज्यपालपद असा शिवराज पाटील चाकूरकर यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button