
रत्नागिरी जिल्ह्यात 15 डिसेंबरपासून गोवर, रुबेलाचे लसीकरण
रत्नागिरी : लहान मुलांमध्ये सध्या गोवर आजाराची बाधा होत आहे. जिल्ह्यातील आजाराचा सामना करण्यासाठी जि. प. च्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. 15 डिसेंबरपासून गोवर व रुबेला याच्या लसीकरणाची सुरुवात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 2 हजार 933 बालकांना हा डोस दिला जाणार आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 25 डिसेंबर 2022 आणि 15 ते 25 जानेवारी 2023 अशा दोन टप्प्यात गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरापासून लसीकरण न झालेल्या बालकांच्या याद्या स्थानिक आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत तयार करण्यात येणार असून 26 जानेवारी 2023 पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चार आठवड्याच्या अंतराने दोन मोहिमा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष लसीकरण सत्राचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठकही नुकतीच पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होेते.