मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा सुधारावा, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकार्यांना तंबी
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी या कामाच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जात सुधारणा करावी अशी तंबी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना दिली आहे.
कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार कडक कारवाई केल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. चौपदरीकरणाच्या काही भागातील कामाची पाटील यांनी पाहणी केली. यावेळी कंत्राटदारांनी अनेक ठिकाणी ढिसाळ कार्यपद्धती वापरल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून अधिकारी वर्गाने परिणामकारकरित्या जातीने देखरेख करावी असे आदेश दिले. तसेच त्या मार्गावर अपघात घडू नयेत यासाठी अधिकार्यानी २४ तास सतर्क रहावे असे सांगितले. गणेश उत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात येत असल्यामुळे त्या काळात रस्त्यावरील खड्डे व दुरूस्त्या तातडीने करण्यात याव्यात अशाही सूचना त्यांनी दिल्या. चौपदरीकरणाचे काम हे मोठ्या स्तरावर असल्याने कोकणातील नागरिकांना काही प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी मान्य केले.