कामथे घाटात ३ लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त
रत्नागिरी ः चिपळूणजवळील कामथे घाटात बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघाजणांना पोलिसांनी पकडले व त्यांना अटक केली. कामथे घाटात दोघेजण बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आणणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिक्षक सुरेश गुरव व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, कॉन्स्टेबल प्रदीप गमरे, योगेश नारवेकर, आशिष भालेकर, पंकज पडेलकर व सोनु वायंगणकर आदींच्या पथकाने सापळा रचला. चिपळूणच्या दिशेने येणारी अल्टो गाडी घाटात थांबून दोघेजण उतरत असता या पथकाने त्यांच्यावर छापा मारला व गाडीची तपासणी केली असता ३ लाख रु. किंमतीचे कातडे मिळून आले. कातड्याची लांबी ४ फूट आहे. या प्रकरणी दोनजणांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे.