देवरूखनजिक निवे धरणाच्याजवळ जमिनीला मोठ्या भेगा, भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करणार
रत्नागिरी ः देवरूखनजिकच्या निवे लघु पाटबंधारे विभागाच्या धरणाजवळ जमीन खचण्याचे व भेगा पडण्याचे प्रकार दोन दिवसांपासून सुरू झाल्याने या धरणाच्या आसपास असलेल्या लोकवस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाच्या जवळ असलेल्या जमिनीत अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे. ही घटना पाटबंधारे विभागाला कळविल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी आले असून या भेगांचे व तड्यांचे गूढ उकलण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांना बोलावण्यात येत आहे. सध्या तरी धरणाला धोका नसला तरी पुढे कोणताही मोठा प्रकार घडू नये यासाठी अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मात्र ग्र्रामस्थांनी याबाबत प्रशासनाने तातडीने उपाय करावेत अशी मागणी केली आहे.