स्कूल बसेसवर आरटीओची कडक नजर, जिल्ह्यातील ६० स्कूल बसेसना फिटनेस सर्टिफिकीटच नाही
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या स्कूल बसेसवर आरटीओची कडक नजर असून या बसेस व अन्य वाहतूक करणारी वाहने यांना आसन मर्यादा दिली आहे. परंतु त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याच्या तक्र्रारी आल्या आहेत. अशा वाहतूक करणार्या जिल्ह्यात अंदाजे ६० स्कूल बसेस असून या बसेसने फिटनेस सर्टिफिकेटच घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या स्कूल बसेसची वाहने योग्य स्थितीत असण्याची गरज आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून या वाहनांची ब्रेकपासून अन्य तपासणी होते. व त्यांना फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. हे फिटनेस सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. परंतु असे असताना विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या ६० स्कूल बसेसनी हे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे उघड झाले आहे. जोवर हे प्रमाणपत्र घेतले जात नाही तोपर्यंत या बसेसचा परवाना निलंबित केला जाणार असल्याचे आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तर अशा परवाना न घेतलेल्या स्कूल बसेस वाहतूक करताना आढळल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे वाहतूक निरीक्षक अनिल विभुते यांनी स्पष्ट केले आहे.