महिलांच्या आंदोलनाचा धसका ः धारतळे आरोग्य केंद्रात आली रूग्णवाहिका
रत्नागिरी ः धारतळे आरोग्य केंद्राला १०८ नंबरची रूग्णवाहिका मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या भागातील महिला व बचत गटांनी दिंडी मोर्चा काही दिवसांपूर्वी आयोजित केला होता. या आंदोलनाची दखल घेत शासनाने धारतळे आरोग्य केंद्राला ही रूग्णवाहिका दिली आहे. ही रूग्णवाहिका येताच महिलांनी त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
राजापूर तालुक्यातील जैतापूर किंवा धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कायम स्वरूपी १०८ रूण्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी या भागातील महिलांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे दिंडी मोर्चा आंदोलन करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. आपण मागणी केलेल्या ठिकाणी तात्काळ १०८ रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे यासाठी २०० ते २५० महिलांनी जिल्हा शासकीय रूग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी दिंडी मोर्चा काढून परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनीदेखील आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून या मागणीबाबत पाठपुरावा केला होता.