मुंबई-ठाण्यावर पावसाचे संकट
मुंबई : मुंबई-ठाण्यात उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबई-ठाणेकरांची धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबई-ठाण्यावर अस्मानी संकट कोसळले असून राज्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. पावसामुळे मुंबईत मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जण ठार झाले आहेत. ठाण्यात एकाचा करंट लागून मृत्यू झाला असून बदलापूर कोंडेश्वर येथे एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईतील अनेकांच्या घरांमध्ये मध्यरात्रीपासून पाणी भरल्याने अनेकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली आहे.
गेले तीन दिवस मुंबई-ठाण्याला झोडपून काढल्यानंतर आज चौथ्या दिवशीही पावसाने मुंबई-ठाण्याची अक्षरश: धुलाई केली. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वेरुळही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबई सेंट्रल येथे ठाकूरवाडी डाऊन मार्गावर एक मालगाडी रेल्वे रुळावरून खाली घसरली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू मुंबईवरून पुण्याकडे रवाना होणाऱ्या इंटरसिटी ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर चार ट्रेनमध्येच थांबवण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, गोरेगाव, कुर्ला, चेंबूर, गोवंडी, कुर्ला, धारावी, वरळी आणि सांताक्रुझ वाकोला परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील घरातही गुडघाभर पाणी साचले आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शाळा-महाविद्यालयांमध्येही पाणी भरले आहे.
www.konkantoday.com