
८० फुटी हायवेवरील अतिक्रमण मोहिमेला नगराध्यक्षांचा सबुरीचा सल्ला
रत्नागिरी ः रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरील जयस्तंभ ते भुते नाका या ८० फुटी रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश नगर परिषदेच्या प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे नगर परिषदेच्या प्रशासनाने या भागाची पाहणी करून अतिक्रमणाबाबत मार्किंग केले होते. ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम प्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहे. मात्र रत्नागिरी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी नगर परिषद प्रशासनाला ही मोहीम राबविण्याबाबत सबुरीचा सल्ला दिला आहे. अतिक्रमण हटविण्याचा जिल्हाधिकार्यांना अधिकार असला तरी या भागात अनेक स्थानिक व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या पोटावर लाथ मारू नका. त्यांना न हटवताच हे रूंदीकरण करावे अशा सूचना नगराध्यक्षांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
यामुळे रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासन जिल्हाधिकार्यांचा आदेश पाळावा की नगराध्यक्षांचा सल्ला ऐकावा या कात्रीत सापडले आहे.