
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूमध्ये सरस्वती पूजन अर्थात ग्रंथ पूजेचे आयोजन तर दीपावली पूर्वी वाचनालय नूतन वास्तुत प्रारंभित करणार – ॲड दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे नूतन इमारतीसाठीचे काम दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी भूमिपूजन करून सुरू झाले. बरोब्बर ९ महिन्यात म्हणजे दि.२ ऑक्टोबर दसऱ्याचा मुहूर्त साधून वाचनालयाची ग्रंथसंपदा परत पूर्ववत नव्या वास्तूत आणून सकाळी ९.३० ते १०.०० या वेळात सरस्वती पूजनाच आयोजन वाचनालयाच्या नव्या इमारतीत करण्याचे योजण्यात आले आहे.
वाचनालयाचे एकूण काम १२००० चौरस फुटाचे असून त्यापैकी तळमजल्याचे ४००० चौ.फुटाचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावटीचे काम अंतिम टप्यात आहे. भूमिपूजना प्रसंगी मी वाचनालय दीपावली पूर्वी नव्या वास्तूत सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार १ लाख १५ हजार ग्रंथ परत नव्या इमारतीत स्थानापन्न झाले असून दसऱ्याचे औचित्य साधून ग्रंथ पूजा करून ग्रंथसंपदेचे नव्या वास्तूत स्वागत करण्याचे योजून हा उपक्रम राबवत आहोत असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
इमारत बांधण्याच आव्हान स्वीकारून ते पूर्णत्वाकडे नेण्याचे अग्नीदीव्य सुरू आहे. त्याचबरोबर वाचनालयाची ग्रंथसंपदा जतन करणे हे महत्वाचे कर्तव्य होते ते पार पाडत परत पूर्ण ग्रंथसंपदा वाचनालयात आणण्यात येत आहे.
विजयादशमीचा सीमोल्लंघनाची प्रथा पार पाडण्यासाठी वाचनालय सज्ज झाले आहे. वाचनालयाचा आत्मा असलेली ग्रंथसंपदा परत वाचनालयात आलेली पाहण्याचे समाधान लाखमोलाचे आहे. नव्या वास्तुत ग्रंथांचे स्वागत करावे, ग्रंथरुपी सरस्वतीचे पूजन करावे या हेतूने गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते १०.०० या वेळात ग्रंथ पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दि.१२ ऑक्टोबर २०२५ पासून वाचनालयाचा सुसज्ज वाचन विभाग कार्यान्वित करण्याचा मनोदय असून पूर्ण वाचनालय फेब्रुवारी अखेरपर्यंत सज्य करून रत्नागिरीचे सुसज्ज सांस्कृतिक केंद्र उभे करून लोकार्पण करण्यात येईल. मायदेश फाऊंडेशन या कामी नवनव्या संकल्पना, योजना तयार करत असून एक सुसज्ज नव्या युगाचे वाचनालय साकारण्यासाठी मायदेश फाऊंडेशन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे अशी माहिती ॲड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सकाळी ९.३० ते १०.०० या वेळात सरस्वती पूजनासाठी सर्वांनी आवर्जून वाचनालयात यावे असे विनम्र आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.




