
निसर्गाचा अद्भुत चमत्कारच! कोल्हापुरात म्हशीने जन्माला घातलं दोन तोंडी रेडकू, दुर्मिळ घटनेने नेटकऱ्यांमध्ये चर्चा!
कोल्हापूर : कधी कधी काही अशा घटना घडत असतात की, निसर्गाचा चमत्कारच म्हणूनच त्याकडे पाहावे लागते. कोणत्याही जीवाचा जन्म ही एक अलौकिक गोष्ट असते. मात्र कधी कधी जन्मावेळीच काही प्राण्यांमध्ये अजब वैशिष्ट्य पाहायला मिळत असते. अशीच एक अचंबित करणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरातल्या एका शेतकऱ्याच्या म्हशीने दुतोंडी रेडकाला जन्म दिल्यामुळे सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
खरंतर कोल्हापूर जिल्ह्यातील घडलेल्या या असामान्य घटनेने सर्वांनाच चकित केले आहे. कोल्हापूरच्या बानगे गावातील रहिवासी सुरेश यशवंत सुतार यांच्या म्हशीने चक्क दोन तोंड असलेल्या एका रेडकाला मंगळवारी जन्म दिला. जन्मावेळी हे रेडकू सुरुवातीला इतर सामान्यच वाटत होते. मात्र म्हशीने जन्म दिल्यानंतर रेडकाला दोन डोके असलेलं पाहून सुतार कुटुंबीयांसह उपस्थित त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. चार पायांसह जन्माला आलेल्या या रेडक्याचे शरीर एकच आहे, परंतु डोके आणि तोंड दोन आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातून लोक या अजब अशा रेडक्याला पाहण्यासाठी गर्दी करु लागले.
सोशल मीडियावर या रेडक्याच्या जन्मानंतरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रेडकाची दुहेरी डोकी स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे त्याचे स्वरूप अधिकच आश्चर्यकारक वाटते.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची घटना दुर्मिळ असते आणि ती जनुकीय दोषामुळे घडू शकते. गर्भाशयात असताना असामान्य पेशी विभाजनामुळे असे दोष निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे रेडकास सामान्य आयुष्य जगणे कठीण होऊ शकते. परंतु जन्मानंतर हे वैशिष्ट्यपूर्ण रेडकू जिवंत होते. मात्र जन्मल्यानंतर 4 तासानंतर त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आणि सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले आहे. अनेकजण याला निसर्गाचा चमत्कार मानत आहेत, तर काहीजण यामागील वैज्ञानिक कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बानगे येथे सुरेश यशवंत सुतार यांच्या घरी सध्या या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे.




