कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम हटाव मोहीम थंडावली
रत्नागिरी ः कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्ह्यातील कार्यकारिणी व पदाधिकार्यांच्या बैठकीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना हटविण्ययाविषयी कदम यांचे विरोधकांचा डाव यशस्वी झाला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर कदम यांचेवर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरूद्ध काम केल्याचा आरोप होता. त्यानंतर मुंबई येेथे कॉंग्रेस वरिष्ठांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते व आपल्याला अध्यक्षपदावरून कोणीही हटवू शकत नाही असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे कॉंग्रेस भवनमधील बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.
बैठकीत थोड्याफार प्रमाणात कदम यांच्याविरोधात तक्रारीचा सूर उमटला. परंतु कालच्या बैठकीला कदम समर्थकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याने या विषयावर वरिष्ठांनी फार मोठी चर्चा न करताच कदम यांना क्लिनचीट दिल्याचे वृत्त आहे.
मात्र उपस्थित असलेल्या दोघा निरिक्षकांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी दरवाजा बंद करून गुप्त चर्चा केल्याने पक्ष कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता आहे.