बहादूरशेख नाक्यातील बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट ; महिला जखमी

चिपळूण:- चिपळूणवासियांच्या पसंतीस उतरलेल्या बहादूरशेख येथील क्वालिटी बेकरी मध्ये आज सकाळी बॉयलरचा स्फोट झाल्याने एक महिला जखमी झाली. तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

आज सकाळी या बेकरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांनी बेकरीच्या दिशेने धाव घेतली. या स्फोटामुळे एक महिला जखमी झाली. या महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व उपचार करून घरी सोडण्यात आले. हा स्फोट बॉयलरचा रबर गरम झाल्याने घडला असल्याचा प्राथमिक अंदाज असून हा स्फोट किरकोळ स्वरूपाचा होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारे मोठी हानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले. याबरोबरच या स्फोटात कोणत्याही प्रकारे सिलेंडरचा स्फोट झाला नाही त्यामुळे विनाकारण काही अफवा पसरवल्या जात असून या स्फोटाला गंभीर वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे येथे उपस्थित असलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले. दरम्यान तहसीलदार श्री. जीवन देसाई आणि पोलीस निरीक्षक श्री. पोळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूचना केली.

सदर घटना घडल्यानंतर चिपळुणातील अनेक सामाजिक व राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान स्फोटाची तीव्रता अधिक नसल्याने लवकरात लवकर ही बेकरी पूर्ववत चालू करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी येथील कार्यकर्त्यांनी केली आहे.
पुढील तपास चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button