
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आलेली लाईफ जॅकेट ग्रामपंचायतीत पडून, पर्यटकांची सुरक्षितता अधांतरीच
रत्नागिरी ः समुद्रकिनार्यावरील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून लाईफ जॅकेट पुरविण्यात आली. मात्र समुद्रात पोहण्यासाठी उतरणार्या पर्यटकांना ही जॅकेट दिली जात नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. समुद्राची माहिती नसल्याने तसेच पोहता येत नसल्याने पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू पावल्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट पुरविण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींना एकूण ६५० लाईफ जॅकेटचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये गणपतीपुळे २५०, वेळणेश्वर ५०, कर्दे ५०, लाडघर ५०, आरे ५०, मुरूड १०० आणि भाट्ये ग्रामपंचायतीला १०० जॅकेट पुरविण्यात आली आहेत.
ग्रामपंचायतींनी ही जॅकेट पर्यटकांना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केलेली नाही. या जॅकेटची जबाबदारी घेणार कोण या मुद्यावर ग्रामपंचायतींनी अद्याप याचा वापर सुरू केेलेला नसल्याचे कळते.