
शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे धाडस नगरपरिषद प्रशासन दाखवणार का ?
रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गा वरील वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी नगर परिषदेला दिले आहेत .मात्र राजकीय अभय असलेली ही बांधकामे पाडण्याचे धाडस रत्नागिरी नगर परिषद प्रशासन दाखवेल का याविषयी शंका आहे. शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लक्ष घातले असून त्यांनी ही बांधकामे तोडावीत असे आदेश रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने काल जयस्तंभ ते भूते नाका या भागाचा सर्व्हे केला त्यामध्ये एसटी स्टँड पासून खालपर्यंत अनेक ठिकाणी अतिक्रमणे आढळून अाली आहेत. ही अतिक्रमणे काही नुकतीच उभी राहिली नसून अनेक वर्षांपासून आहेत. पूर्वी ही अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी हस्तक्षेप करून कारवाई थांबवण्यात आली होती . त्यामुळे जिल्हाधिकारी यानी आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात रत्नागिरी नगर परिषद प्रशासन ही कारवाई करण्याचे धाडस दाखवणार नाही हे लवकरच कळणार आहे.