
पर्यटकांचे जीव धोक्यात घालून वाचविणार्या जीवरक्षकांना मानधन नाही प्रस्ताव धुळ खात पडला
रत्नागिरी ः कोकणातील समुद्रकिनार्यावर पर्यटकांचे बुडण्याचे प्रकार घडल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेसाठी किनार्यावर नेमण्यात आलेल्या जीवरक्षकांना काम करुन मानधनच मिळत नसल्याने नाराजी निर्माण झाली असून या जीवरक्षकांनी पुढील काम करण्यास नकार दिला आहे. या सुरक्षा रक्षकांना ग्रामपंचायत मानधन देवू शकत नाही म्हणून हे मानधन शासनाने द्यावे अशी त्यांची मागणी आहे. प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांचे मानधन शासनाने स्वतःच्या फंडातून द्यावे अशी मागणी ग्रामपंचायतीनी केली होती. त्यानंतर ६७ जीवरक्षकांच्या मानधनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव तेथेच धूळ खात आहे. मानधन मिळत नसल्याने जीवरक्षक किनार्यावर काम करायला तयार नाहीत. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
समुद्रसफरीचा आनंद मनसोक्त घ्यावा यासाठी कोकणात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. समुद्राच्या भरती ओहोटीचे परिणाम, प्रत्येक ठिकाणच्या समुद्रकिनार्यांची रचना, खोली यांचा अंदाज पर्यटकांना नसतो. काही पर्यटकांचा अतिउत्साह, अतिआत्मविश्वास आणि अज्ञान यामुळे काही पर्यटकांचा मृत्यू होतो. दुर्घटना घडली की त्या क्षणापुरती सरकारी प्रशासकीय यंत्रणा हलते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी घटनास्थळी भेट देतात. काही उपाययोजना करण्याची आश्वासने देतात कालांतराने पुढील दुर्घटना घडेपर्यंत तो विसरून जातात. गतवर्षी जून महिन्यात आरेवारे येथील दुर्घटनेंतर किनारा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.




