
कोकण मुंबईसह २४ तासात जोरदार पावसाचे आगमन
पुणे : आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. पण हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दरम्यान, गुरुवारी अखेर मान्सून तळ कोकणात दाखल झाला. तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनला सुरूवात झाली. मान्सूनने आगमनाच्या दुसर्याच दिवशी काहिशी विश्रांती घेतली असली शनिवारपासून मात्र, मान्सूनची वाटचाल नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचा खुलासा पुणे वेधशाळेकडून करण्यात आला आहे.
२५ तारखेनंतर मात्र, मान्सून पुन्हा काहिशी उघडीप घेऊ शकतो. कारण, अरबी समुद्रात अजूनही मान्सूनसाठी म्हणावे तेवढे पोषक वातावरण तयार होऊ शकलेले नाही. या उलट पश्चिम बंगालच्या उपसागरावरचं कमी दाबाचं क्षेत्रं अजूनही अक्टिव्ह आहे असं पुणे वेधशाळेचं म्हणणं आहे. पण असं असलं तरी मुंबईत २५ तारखेला तुफान पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात मान्सूनला वातावरण अनुकूल असून येत्या २ ते ३ दिवसामध्ये मान्सून राज्याच्या इतर भागातही सक्रीय होणार आहे. १३ ते १४ जून दरम्यान राज्यात मान्सूनचं आगमन होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबलं. अखेर तळ कोकणात मान्सूनचं आगमन झालं आहे. येत्या ४८ तासामध्ये मान्सून उर्वरित राज्यात देखील दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.