पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवा, पंतप्रधानांचे सरपंचाना आवाहन
रत्नागिरी ः जिल्ह्यात पडणार्या पावसाचे पाणी आपल्या परसबागेत जीरले पाहिजे आणि त्याचा उपयोग पुढील काळात व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्व सरपंचांना पाण्याचा प्रत्येक थेंब जिरविणे गरजेचे असल्याचे पत्र पाठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सरपंचांना पत्र पाठविले असून या पत्रात मोदी यांनी म्हटले आहे की, वर्षा ऋतुचे आगमन होत आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात की देवाने आपल्याला पावसाची देणगी दिली आहे. त्याचा आदर करून त्याचे कर्तव्य बजावण्यासाठी पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जास्तीत जास्त संकलन करण्यासाठी उपाययोजना करा, तसेच शेतीची बांधबंधिस्ती, नदीनाल्यांमध्ये बंधारे, तलावांचे खोलीकरण, सफाई, वृक्षारोपण करीत शेतातील पाणी शेतामध्ये आणि गावातील पाणी गावामध्ये साठविले पाहिजे असेही त्यांनी पत्रात नमुद केले आहे.