कोकणसाठी या सरकारने काहीही केले नाही ः आ. भास्कर जाधव
चिपळूण ः कोकणवर या सरकारने अन्याय केला असून कोकणसाठी काहीही केले नसल्याचे मत माजी मंत्री आ. भास्करशेठ जाधव यांनी व्यक्त करून त्याबद्दल तीव्र नाराजी विधानसभेत बोलताना व्यक्त केली. या सरकारने कोकणासाठी काय केले ते छातीठोकपणे सांगावे, जे तीन बंधारे झाले ते कोणी केले ते स्पष्ट करावे, आपण मंत्री असताना सुरू केलेली ही कामे आहेत. या पलिकडे सरकार शिवसनेवरील रागापोटी कोकणावर अन्याय करीत आहे. सरकार जाणीवपूर्वक कोकणवर सूड उगवतेय काय असा घणाघाती जाब त्यानी सभागृहात विचारला. हे राज्यपालांचे भाषण अत्यंत निरस असल्याने आपण त्याला विरोध करतो असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांचे भाषण हे राज्य सरकारच्या वाटचालीचा आरसा असतो. पण या भाषणात तसे काही नसल्याचे सांगतानाच कोकणातील पर्यटन, मच्छिमारांचे प्रश्न, महामार्गाचे संथ गतीने सुरू असणारे काम, स्वतंत्र मत्स्यविद्यापीठ स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय, मत्स्य व्यवसायात देशाला व राज्याला मिळणारे उत्पन्न, कोकण विकासाचे नियोजन आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षाची मागणी असतानाच त्याचा अभिभाषणात उल्लेख नाही. पर्यटन हा कोकणच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. कोकण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करून भरीव आर्थिक तरतुदीचा उल्लेख नाही. मुंबई विद्यापीठातील ताण कमी करण्यासाठी १०३ महाविद्यायांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे, कोकणातील हापूससाठी फळावर निर्यातपूर्व प्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करून बागायतदारांना दिलासा द्यावा. कोकणात ३५०० मि.मि. पाऊस पडतो तरी येथे भीषण पाणीटंचाई असते.