
थोर शिवचरित्रकार सद्गुरूदास महाराज यांची लो. टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट
रामभाऊ साठे संग्रहालय व बाळशास्त्री जांभेकर सभागृह पाहून दिले कौतुकाचे उद्गगार
थोर इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार आदरणीय विजयराव देशमुख तथा सद्गुरूदास महाराज यांनी लो. टिळक स्मारक वाचन मंदिराला रविवारी सकाळी भेट दिली. ‘पत्रभेट’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी महाराज चिपळूण येथे आले होते. या भेटीच्या निमित्ताने लो. टिळक स्मारकाच्या कार्याध्यक्ष श्री. अरुण इंगवले यांनी त्यांना ग्रंथालयाला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते.
भेटीदरम्यान सहकार्यवाह श्री. विनायक ओक यांनी सद्गुरूदास महाराजांचे स्वागत केले आणि ग्रंथालयाने साकारलेले ‘रामभाऊ साठे संग्रहालय’ दाखविले. आरोग्य ठीक नसतानाही महाराजांनी प्रत्येक वस्तू व तिच्या ऐतिहासिक संदर्भाविषयी सखोल माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी ‘बाळशास्त्री जांभेकर सभागृहातील तैलचित्रे’ पाहिली आणि संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष श्री. अरुण इंगवले यांनी उपरणे देऊन, तर श्री. विनायक ओक यांनी ‘तेजशलाका’ हा ग्रंथ देऊन सद्गुरूदास महाराजांचा सत्कार केला.
मनोगत व्यक्त करताना श्री. अरुण इंगवले म्हणाले, “सद्गुरूदास महाराजांनी लिहिलेल्या शिवचरित्राच्या शेवटी दिलेली परिशिष्टे हे त्या ग्रंथाचे आत्मा आहेत. या परिशिष्टांमुळेच ‘शिवचरित्र’ हे अक्षरधन ठरले आहे.”
या कार्यक्रमास सौ. अर्चना बक्षी, संस्थेचे कर्मचारी, तसेच सद्गुरूंचा शिष्यवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वातावरणात अध्यात्म, इतिहास आणि ज्ञान यांचा संगम अनुभवायला मिळाला.




