मान्सून सक्रिय, टंचाईग्रस्त भागाला दिलासा
रत्नागिरी ः एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणी केलेल्या शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या गावे, वाड्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
१२ जूनपासून पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली होती. आठवडाभर कडक ऊन पडल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात पेरणी केलेल्या शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पावसाचे दमदार पुनरागमन न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ग्रामीण भागातील काही गावांमध्ये निर्माण झाले होते.
शहरी, ग्रामीण भागात यंदा विक्रमी पाणीटंचाई निर्माण झाली होती. नगरपालिका, नगरपंचायत, एमआयडीसी क्षेत्रात एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू होता. बहुतांशी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने टंचाईवर मात करणे अशक्य झाले होते. दोन दिवसात मान्सून सक्रीय न झाल्यास ग्रामपचायत क्षेत्रातील पाणी पुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा इशारा रत्नागिरी एमआयडीसीच्यावतीने देण्यात आला होता.